सरहद, पुणे आयोजित
महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने
महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जयंती वर्षानिमित्त महिला अधिकाऱ्यांचे

पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२६

मराठी — ज्ञानभाषा, लोकभाषा आणि साहित्यभाषा

ज्ञानात्मक विचार, सिद्धांत आणि व्याख्या समर्थपणे मांडू शकते ती भाषा ‘ज्ञानभाषा’. मराठी भाषा ज्ञानभाषा होऊ शकत नाही, असे काही जण म्हणतात—परंतु तो निष्कर्ष बहुतेकदा भाषेचा इतिहास आणि ‘ज्ञान’ या संकल्पनेबाबतच्या गैरसमजांतून निर्माण होतो.

ज्ञान-साहित्य लोकसाहित्य समृद्ध परंपरा सर्व वाङ्मयप्रकार
लेख

१) ज्ञानभाषा म्हणून मराठी

ज्ञान • संशोधन • व्याख्या

जी भाषा ज्ञानात्मक विचार, सिद्धांत आणि व्याख्या समर्थपणे मांडू शकते, त्या भाषेला ‘ज्ञानभाषा’ म्हटले जाते. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यास समर्थ नाही, असे काही लोक म्हणत असतात; मात्र त्यामागे मराठी भाषेचा इतिहास आणि ‘ज्ञान’ म्हणजे नेमके काय, याबाबतचा गोंधळ दिसून येतो.

ज्ञानाच्या कवेत जीवनातील सर्वच क्षेत्रे येतात—ती काव्यापासून सुरू होऊन तत्त्वज्ञान आणि विज्ञानापर्यंत विस्तारते. प्राचीन मराठीत निर्माण झालेला वररुचीचा व्याकरण-ग्रंथ ज्ञानविचार देणारा नव्हता, असे कोण म्हणेल?

संघदास गणी यांच्या “वासुदेव हिंडी” या तिसऱ्या शतकातील ग्रंथात कथेच्या ओघात तत्कालीन व्यापारपद्धती, व्यापारी तांडे, व्यापारी श्रेण्या ते प्राचीन देशांतर्गत आणि देशाबाहेर जाणाऱ्या व्यापारी मार्गांची माहिती येते; त्यातून तत्कालीन अर्थव्यवस्था आणि समाजजीवनाचे मार्गदर्शन होते. समाजशास्त्र, अर्थशास्त्र यांबरोबरच भूगोलशास्त्राची वास्तविक माहितीही ज्ञानाच्याच कक्षेत येते, हे लक्षात घ्यायला हवे.

वैशिष्ट्य अशी माहिती त्या काळात ग्रीक भाषा वगळता अन्य भाषांत दुर्मीळ होती.

“वासुदेव हिंडी”सारखा ग्रंथ हा ज्ञान-परंपरेचा ठोस पुरावा मानता येतो.

संत ज्ञानेश्वरांचा “अमृतानुभव” हा तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील एक मौलिक ग्रंथ आहे. आधुनिक काळात गजानन क्षीरसागर ते डॉ. जयंत नारळीकर आणि डॉ. संजय ढोले यांनी केवळ स्वतंत्र विज्ञानकथा लिहिल्या नाहीत, तर विज्ञानावर मूलभूत संशोधनही काही प्रमाणात विशद केले आहे.

नीतिशास्त्र या ज्ञानशाखेला वाहिलेले ग्रंथ लो. टिळक, दि. के. बेडेकर ते संजय सोनवणी यांनी मराठीतच लिहिले आहेत; आणि ते अनुवाद नाहीत—ही बाबही लक्षात घ्यावी.

थोडक्यात, मराठी ही ज्ञानभाषा आहे. आणि आता अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठीत आणखी मौलिक ज्ञाननिर्मितीची संभावना अधिक दृढ होते.

२) लोकभाषा आणि बोलींचा समृद्ध ठेवा

बोली • लोकसंस्कृती

मराठी भाषेत आजमितीला किमान ६० बोलीभाषा आहेत आणि त्यांतील प्रत्येक बोलीभाषेत लोकसाहित्याचा मोठा संभार आहे. या सर्व बोली मराठीचे सौंदर्य वाढवतातच, पण स्थानिक लोकसंस्कृतीचे रूपही दाखवतात.

लोकसाहित्याचे संकलन आणि त्यावर अभ्यास करणाऱ्या विद्वानांची डॉ. सरोजिनी बाबर ते आताच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर अशी मोठी फळी आहेच; शिवाय विद्यापीठीय पातळीवरही सातत्याने संशोधन व अभ्यास सुरू असतो.

३) साहित्यभाषा म्हणून मराठी

काव्य • कादंबरी • नाटक

मराठी साहित्याला प्रदीर्घ पार्श्वभूमी आहे. प्राचीन काव्यरचना आणि महाकाव्यांपासून—हाल सातवाहनांचे “गाथा सप्तशती”, पादलिप्ताचार्यांचे “तरंगवइ”, उपहासकथा “धुर्ताख्यान”, बाबा पदमनजी यांची आधुनिक शैलीतील कादंबरी “यमुना पर्यटन”— ते आजच्या वर्तमानातील भालचंद्र नेमाडे, प्रवीण बांदेकर, रंगनाथ पठारे, विश्वास पाटील, शरणकुमार लिंबाळे यांसारख्या साहित्यिकांपर्यंत मराठीची परंपरा अखंड आहे.

विजय तेंडुलकर ते प्रेमानंद गज्वींसारखे नाटककार राष्ट्रीय पातळीवर गाजलेले आहेत.

निष्कर्ष कोणताही वाङ्मयप्रकार/ज्ञानसाहित्य प्रकार मराठीत अपवाद नाही.

कोशरचनांतही मराठी भाषा देशात अग्रक्रमावर राहिलेली आहे. थोडक्यात, मराठी भाषेने हाताळलेला नाही असा कोणताही वाङ्मयप्रकार किंवा ज्ञानसाहित्य प्रकार उरलेला नाही.