सरहद, पुणे आयोजित
महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने
महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जयंती वर्षानिमित्त महिला अधिकाऱ्यांचे

पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२६

मराठी भाषेचा किमान २,२०० वर्षांचा लिखित प्रवास

मराठी भाषेला अभिजात दर्जा घोषित झाल्याने एक निखळ सत्य अधोरेखित झाले — ही भाषा प्राचीन, स्वतंत्र आणि मौलिक साहित्याचा सलग प्रवाह सातत्याने दाखवणारी आहे.

प्राचीन पुरावे साहित्य परंपरा संत-साहित्य आधुनिक मराठी
लेख

उपलब्ध पुराव्यांनुसार मराठी भाषा किमान २,२०० वर्षांपासून लिखित स्वरूपात अस्तित्वात होती. इ.स.पूर्व २०० मधील “पाअड लख्खन सुत्त” (वररुचीकृत व्याकरण) प्राधान्याने माहाराष्ट्री प्राकृत — म्हणजेच प्राचीन मराठीचे व्याकरण सूत्रबद्ध करते. याचाच अर्थ, महाराष्ट्रातील लोकांच्या बोलण्यात ही भाषा त्याही पूर्वीपासून नित्य व्यवहारात वापरली जात होती.

इ.स.पूर्व पहिल्या शतकातील नाणेघाट, लोहगड आणि पाले येथील शिलालेखही उपलब्ध आहेत. याच काळात सातवाहन घराण्यातील नृपती हाल यांनी संपादित केलेला “गाथा सप्तशती (गाहा सतसइ)” हा काव्यग्रंथ तत्कालीन समाजजीवनाच्या भावभावनांचे मनोरम दर्शन घडवतो. या संग्रहात किमान २८ कवयित्रींच्या रचनांचा समावेश आहे — हे विशेष उल्लेखनीय आहे.

त्यानंतर जैन आचार्य विमलसूरी यांनी इ.स. ६ मध्ये “पउमचरिय” हे रामकथेवरील आद्य महाकाव्य लिहिले. तेव्हापासून साहित्याचा सलग प्रवाह आपल्याला आढळून येतो. मग ते तिसऱ्या शतकातील आद्य प्रवासकथात्मक वासुदेव हिंडी असो, की उपकथात्मक धुर्ताख्यान असो, लिलावइ सारखे प्रेमकथा असलेले महाकाव्य असो, किंवा कुवलयमाला यासारखी अद्भुतरम्य प्रेमकथा असो — जीवनाच्या अनेक पैलूंना स्पर्श करणारे साहित्य मराठीत लिहिले गेले.

कालौघात भाषा विकसित होत जातात — हेच जिवंत भाषेचे लक्षण असते. सातवाहनकालीन मराठीही कालौघात बदलत राहिली. या बदलाच्या खुणा आपल्याला प्रत्येक शतकातील साहित्यात दिसतात. बाराव्या शतकातील महान कवी मुकुंदराज हे आधुनिक मराठीचे उद्गाते म्हणता येतील. ते जुनी मराठी आणि नवी मराठी यांतील महत्त्वाचा दुवा ठरले.

ज्ञानेश्वर ते तुकाराम असा सलग संतसाहित्याचा प्रवाह मराठीच्या प्रगत होत जाण्याचा ठोस पुरावा आहे. तसेच बखरी व तत्कालीन पत्रव्यवहार समाजजीवनातील बोलण्यातल्या मराठीचेही दर्शन घडवतात.

आज मराठीने आधुनिक रूप धारण केले आहे. आजचे मराठी साहित्य मानवी संवेदनांना, आशा-आकांक्षांना कवेत घेत सर्व आधुनिक साहित्यप्रकार हाताळत मराठी भाषेचे वैभव वाढवत आहे.

मराठी भाषेने अन्य भाषांतील शब्द स्वतःचे रूप देऊन जसे स्वीकारले, तसेच अन्य भाषांनाही शब्द उधार दिले. तरीही मराठी भाषेची मूळ प्रवृत्ती प्राचीन काळापासून आजतागायत अखंड व सलग राहिल्याचे दिसते.

केंद्र सरकारने रंगनाथ पठारे समितीचा अहवाल स्वीकारून मराठी भाषा स्वतंत्र असल्याची खात्री दिल्याने मराठी भाषकांच्या आत्मसन्मानात भर पडली आहे — आणि संवर्धनाला निश्चितच मोलाची मदत होणार आहे.